Dainik Maval News : मावळ तालुक्यातील उर्से येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावातील ओंकार सचिन ठाकर याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली. ओंकार हा येळसे येथील पवना विद्या मंदिर विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच कुस्तीच्या मैदानावरही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच मावळ तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उर्से येथील जय बजरंग तालीम, श्री पद्मावती मंदिर परिसरात ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत मावळ तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ओंकारने आपल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांशी जोरदार लढत देत कुस्तीचे उत्कृष्ट डावपेच सादर केले. आत्मविश्वास, ताकद, चपळाई आणि नियमित सरावाच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.
ओंकार सध्या इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून, दहावीच्या अभ्यासासोबतच कुस्तीच्या सरावावरही तो विशेष लक्ष देत आहे. नियमित सराव, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तालुकास्तरीय स्पर्धेत मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करावी, याचे ओंकारचे यश उदाहरण ठरले आहे.
ओंकारच्या या यशाबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे,व संस्थेचे सचिव व शालेय समितीचे अध्यक्ष संतोष खांडगे, मुख्याध्यापक शितल शेटे व पर्यवेक्षक रोशनी मराडे यांनी त्याचे अभिनंदन केले.
ओंकारला कुस्तीच्या सरावासाठी शाळेतील शिक्षक गणेश ठोंबरे, राजकुमार वरघडे, भारत काळे, सुनिता कळमंकर, ज्योती कोंडभर, सुप्रिया पुंडले व निकीता काळे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे ओंकारने हे यश संपादन केले.
ओंकारच्या या यशामुळे येळसे गावासह पवना विद्या मंदिर विद्यालयाचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे. त्याच्या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, कुटुंबीय, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण होण्यासाठी अशा शालेय स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत आहेत. ओंकारच्या या यशामुळे परिसरातील युवा खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असून, आगामी जिल्हास्तरीय व इतर स्पर्धांमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्याला देण्यात आल्या.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप
– पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
– टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी
– ‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
