पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात गोळीबार करून दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अवघ्या दोन दिवसातच बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींकडून 11 लाखाची रोख रक्कम, 3 दुचाकी, मोबाईल असा 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ( Robbery In Pune Market Yard Area Police Arrested Thieves In Two Day )
ही घटना शनिवारी (12 नोव्हेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास मार्केट यार्ड येथे घडली होती. मार्केट यार्ड परिसरातील एका कार्यालयात भरदिवसा घुसून गोळीबार करत चोरट्यांनी 28 लाखांची रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने आदित्य अशोक मारणे (वय 28, रा. रामनगर,वारजे), गुरुजनसिंह सेवासिंह विरक (वय 22, वर्षे,शिवाजीनगर), दिपक ओम प्रकाश शर्मा (वय 19, राहुलनगर, शिवणे), विशाल सतीश ( वय 20, मंगळवार पेठ), निलेश बाळू (वय 20, एस. आर. ए. स्कीम, मंगळवार पेठ), अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता ( वय 20, मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे ( वय 23, श्रीराम चौक, वारजे) यांना अटक केली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरातील गणराज मार्केट इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या एका पोटमाळावजा जागेत द प्रोफेशनल कुरिअर नावाने अंगडीया यांचा व्यवसाय चालतो. शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास अंगडीया यांच्या कार्यालयात दोन कर्मचारी नियमीत काम करत होते. त्यावेळी अचानक तिथे एक व्यक्ती आला आणि कर्मचारी काम करत असलेल्या काचेच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागला. हे पाहून दुसऱ्याने त्याला धक्का देऊन बाहेर काढले आणि काचेचा दरवाजा लावून घेतला.
पण संबंधिताने थेट कोयता काढून केबिनची काच फोडली आणि त्याच्या मागून आलेल्या दुसऱ्या व्यक्तीने थेट पिस्तूल काढून जमिनीवर गोळी झाडली. त्यातल्या एकाने केबिनमध्ये घुसून रोख रक्कम रोकड बाहेरील व्यक्तीकडे दिली. त्यांनी रोकड पिशवीमध्ये भरुन तेथून पळ काढला. हा सगळा प्रकार घडत असताना इमारतीच्या बाहेर त्यांचे तीन साथीदार थांबवले होते. दरोडा टाकताच पाचही जणांनी धावत जाऊन पुढे थांबलेल्या दोन दुचाकींवरुन पळ काढला.
पोलिसांनी संबंधित कार्यालय ECf रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दरोड्यातील एक आरोपी मावळ तालुक्यातील मोर्वेगाव येथील साई फार्म हाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळताच अधिक तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या.आरोपी कारागृहात असतानाच त्यांनी दरोडा टाकण्याचा कट रचला होता आणि त्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला, असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. या गुन्ह्यातील दोन आरोपींवर मोका लावलेला आहे, त्यामध्ये ते फरारी होते. पोलिसांनी 7 जणांना दोन दिवसात अटक केली. आणखी चार-पाच जण फरार असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींची आढावा बैठक संपन्न
– लोणावळा एअरफोर्स परिसरात विनापरवाना ड्रोनद्वारे शूटींग, गुन्हा दाखल I Lonavla Crime