Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापनदिन बुधवार (दि. १० जून) रोजी साजरा करण्यात येणार आहे. पक्षाच्या जडणघडणीत, संघटन विस्तारात तसेच राज्यभर पक्ष बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान देणारे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना यंदाचा वर्धापनदिन समर्पित करण्यात आला असल्याची माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.
वर्धापनदिनानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सकाळी १०.१० वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वडगाव मावळ येथे पक्षाचे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील (अण्णा) शंकरराव शेळके यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या २७ वर्षांत राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या प्रवासात पक्ष संघटना उभारणे, कार्यकर्त्यांना बळ देणे आणि पक्षाचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी स्व. अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्याच योगदानाचा गौरव म्हणून यंदाचा वर्धापनदिन त्यांना समर्पित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुकाणू समितीचे सदस्य, तालुका कार्यकारिणी सदस्य, सर्व सेल अध्यक्ष, शहर व विभाग सुकाणू समिती सदस्य, शहराध्यक्ष, विभागाध्यक्ष, गावाध्यक्ष, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पक्षप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी स्व. अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान कार्यकर्त्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या कार्याला समर्पित असलेल्या या २७ व्या वर्धापनदिन कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. – गणेश खांडगे, अध्यक्ष मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम
– खासदार श्रीरंग बारणे : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती
– आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान
– तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

