Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकातील तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवरील चोरीस गेलेला सुमारे १.३०० किलो वजनाचा चांदीचा मुकुट तळेगाव दाभाडे पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोधून काढत आरोपींना अटक केली आहे. याबाबतची माहिती परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मे २०२६ रोजी सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान जिजामाता चौकातील तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील लाल रंगाचे खडे जडवलेला सुमारे १.३०० किलो वजनाचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी मंदिराचे विश्वस्त बाळासाहेब शिळीमकर यांच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२०२६, बीएनएस कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे रवी जटाशंकर सोनी (वय ३४, सध्या कुदळवाडी, मूळ उत्तर प्रदेश) आणि रमेश श्रीराम सोनी (वय ३६, सध्या हिंजवडी फेज-२, मूळ उत्तर प्रदेश) यांनी हा मुकुट चोरी केल्याचे निष्पन्न झाले. चोरीनंतर त्यांनी मुकुट आकुर्डी येथील नातेवाईक दयासागर सोनी यांच्याकडे ठेवून उत्तर प्रदेशातील मूळ गावी पलायन केले होते.
तपास पथकाने उत्तर प्रदेशमध्ये जाऊन स्थानिक स्तरावर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोन्ही आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. तसेच आरोपींकडून चोरीस गेलेला चांदीचा मुकुट हस्तगत करण्यात आला.
हस्तगत केलेला मुकुट पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या हस्ते मंदिराच्या विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आला. या यशस्वी कारवाईमुळे तळेगाव परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून मंदिरातील चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणल्याबद्दल पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नागरिकांनी तक्रारींसाठी परिमंडळ ४ शी संपर्क साधावा : श्वेता खेडकर
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ ४ अंतर्गत चिखली, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, दक्षिण म्हाळुंगे, उत्तर म्हाळुंगे आणि शिरगाव-परंदवडी या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारींचे निराकरण न झाल्यास नागरिकांनी थेट परिमंडळ ४ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी केले
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम
– खासदार श्रीरंग बारणे : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती
– आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान
– तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल




