Dainik Maval News : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, श्रीक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इंद्रायणी नदीच्या विविध भागांमध्ये मोठ्या संख्येनं मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. काही मृत माशांवर किडे पडल्याचेही दिसून आले असून, त्यामुळं परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. नदीकिनारी येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नदीतील प्रदूषणाची पातळी वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी विविध शासकीय यंत्रणा आणि स्थानिक संस्थांकडून लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळल्यानं स्वच्छता मोहिमांच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. नदी प्रदूषणास कारणीभूत असलेल्या घटकांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांनी तातडीनं पुढाकार घेत नदीतील मृत मासे बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. स्वयंसेवकांनी मृत माशांची विल्हेवाट लावून नदी परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

