मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या टाकींसाठी तेरा गावांमध्ये जागा उपलब्ध होत नसल्यामुळे आमदार सुनिल शेळके यांनी त्या गावांमध्ये बॅनर लावून स्थानिक नेतेमंडळींसह ग्रामस्थांना जाहीर आवाहन केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जाहीर आवाहनात आमदार शेळके यांनी म्हटले आहे की, “गावातील पुढारी मंडळी व ग्रामस्थांना जाहीर आवाहन, आपल्या गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत निधी उपलब्ध झाला असुन सदर पाणी योजनेचा विकास आराखडा बनविताना भविष्याचा विचार करुन लोकसंख्येनुसार पाण्याची टाकी बांधणेसाठी ग्रामपंचायतीकडून हमीपत्र प्राप्त झाले होते. परंतु सदर टाकीसाठी अद्यापही जागा उपलब्ध करुन दिलेली नसल्याने योजनेचे काम रखडले आहे. तरी कृपया, गावाच्या हितासाठी सर्वांनी एकमताने विचार करुन टाकीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि आपल्या गावातील पाणी योजनेचे प्रलंबित असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, ही नम्र विनंती.”
- मावळात नऊ धरणे असुन देखील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. विशेषतः महिलांना पाणी आणण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो. आमदार सुनिल शेळके यांनी निवडणुकीआधी दिलेला शब्द पाळून प्रत्येक घरापर्यंत पाणी आणण्याचे स्वप्न सत्यात साकारले. यासाठी प्रत्येक स्तरावर पाठपुरावा, वेळोवेळी संयुक्त बैठका घेऊन ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 112 पाणी योजनांचे काम सुरु आहे. अनेक योजनांचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु काही गावातील तांत्रिक अडचणीमुळे कामांना विलंब होत आहे. वारंवार पाठपुरावा करुन देखील स्थानिक लोकप्रतिनिधी, पुढारी मंडळी, ग्रामस्थ गांभीर्याने घेत नसल्यामुळे अखेर आमदार शेळके यांनी गावात बॅनर लावून जाहीर आवाहन केले आहे.
तालुक्यात अनेक दानशूर व्यक्तींनी पाण्याच्या टाकीसाठी जागेसाठी जागा देऊन गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी योगदान दिले आहे. अनेक कुटुंबांनी दातृत्वाचा आदर्श यामाध्यमातून समाजासमोर ठेवला आहे. तालुक्यातील गावांच्या विकासासाठी मूलभूत आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर असतो. त्यासाठी पुरेसा निधी विविध माध्यमांतून उपलब्ध करण्यात येतो. परंतु संबंधित विकास कामांच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतीकडे जागाच उपलब्ध नसते. केवळ जागेअभावी गावाच्या विकासाला खीळ बसू नये, ही यामागची भावना असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
टाकीसाठी जागा उपलब्ध नसलेली गावे –
गावाचे नाव – टाकी क्षमता
आंबळे – 10 हजार लिटर
भाजगाव – 17 हजार लिटर
गोवित्री – 58 हजार लिटर
नागाथली – 8 हजार लिटर
सांगिसे – 10 हजार लिटर
थोरण – 20 हजार लिटर
शिरदे – 17 हजार लिटर
शिवली – 61हजार लिटर
भडवली – 42 हजार लिटर
गेव्हंडे खडक – 20हजार लिटर
पांगळोली – 85 हजार लिटर
वारु – 28 हजार लिटर
कादव – वाघेश्वर – 26 हजार लिटर
अधिक वाचा –
– दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटपास सुरु, मावळ तालुक्यात 37 हजार शिधा संचाचे होणार वाटप
– काँग्रेस (आय) पक्षाच्या मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्षपदी बंडोबा मालपोटे यांची नियुक्ती
– मावळात 21 पैकी 13 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे सरपंच! भाजप-राष्ट्रवादी दोघांचाही दावा असलेले 2 सरपंच कोणते? वाचा