मावळ ग्रामीण भागात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार अधिक सुरळीत व्हावा, यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून मावळातील 43 तलाठी कार्यालयांना एकूण 8 कोटी 76 लक्ष तर तळेगाव दाभाडे, खडकाळा, लोणावळा, कार्ला, शिवणे, वडगाव मावळ आणि काले या सात मंडल अधिकारी कार्यालये बांधण्यासाठी 1 कोटी 42 लक्ष असा एकूण 10 कोटी 19 लक्ष निधी उपलब्ध करण्यात आला असून अनेक कार्यालयांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तलाठी हा शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असतो. शेतजमिनी संबंधित अभिलेख अद्ययावत रहावेत तसेच विविध नोंदणी दाखले यासाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयात जावे लागते. गाव पातळीवरील शासनाचा महत्त्वाचा घटक म्हणून तलाठ्यांकडे अनेक कामे सोपविण्यात आलेली असतात. तलाठी कार्यालयात जवळपास चार गावांचा कारभार, शेती संदर्भातील सर्व दस्तावेज व नोंदी ठेवणे याव्यतिरिक्त नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे करणे, त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे,रहिवासी व उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करून देणे, पीक कापणी प्रयोग, ई-पीक पाहणी इ.उपक्रमांची अंमलबजावणी करणे अशा कामांमुळे तलाठी कार्यालय महत्त्वपूर्ण असते.या सर्व कामांमुळे ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.
मावळ तालुक्यात 43 सजा असणाऱ्या गावांपैकी 20 सजांमध्ये तलाठ्यांना बसण्यासाठी हक्काची कार्यालये नव्हती. काही कार्यालयांची अत्यंत दुरावस्था झाली होती. त्यामुळे काही तलाठी ग्रामपंचायत कार्यालयात बसुन कामकाज करत होते. तर काही तलाठी मंडल कार्यालयात बसून आपल्या गावांचा कारभार सांभाळत होते. परंतु मंडल कार्यालय गावापासून दूर असल्याने तसेच तलाठी येण्याची वेळ निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात. कधी इंटरनेटची सेवा बंद तर कधी सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांची कामे खोळंबुन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
शासकीय कार्यालयांच्या दुरावस्थेमुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यात येणाऱ्या अडचणी, या कार्यालयांमध्ये काम घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन आमदार सुनिल शेळके यांनी गावातच नवीन तलाठी कार्यालय बांधल्याने सामान्य नागरिकांचे कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होईल. ( There will be 7 mandal and 43 talathi offices in Maval taluka MLA Sunil Shelke )
मागील अनेक वर्षांपासून गावांमध्ये तलाठी कार्यालयाची स्वतंत्र इमारत नसल्याने गैरसोय होत होती. तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना देखील अपुऱ्या जागेमध्ये कामकाज करावे लागत होते. आता मंडलाधिकारी आणि तलाठी यांच्या सुसज्ज व स्वतंत्र कार्यालयांमुळे नागरिकांना उत्तम सेवा-सुविधा मिळतील व महसुली कामकाजाला गती मिळून नागरिकांना येणाऱ्या अडचणी कायमच्या दूर होतील. – आमदार सुनिल शेळके
अधिक वाचा –
– ‘छत्रपती शिवरायांचा एक गुण अंगिकारला तरीही जीवनात यशस्वी व्हाल’, वारंगवाडीमध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षिस वितरण
– धक्कादायक! कार ओढ्यात कोसळून डॉक्टरचा मृत्यू, मावळमधील चांदखेड येथील घटना
– Breaking! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, लगेच वाचा